पैठण गेट, घाटी परिसरातील अतिक्रमण भुईसपाट

Foto
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथकामार्फत बुधवारी शहरातील पैठण गेट व घाटी परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले.
पैठण गेट कॉर्नर लगत एका जागा मालकाने महानगरपालिकेची परवानगी न घेता नोव्हेंबर महिन्यात निष्कासित करण्यात आलेल्या रस्ता बाधित जागेवर पुन्हा दुकाने थाटून अनधिकृत बांधकाम केले होते. याबाबत बांधकाम धारकास वेळोवेळी सहाय्यक आयुक्त प्रभाग क्रमांक दोन व अतिक्रमण निरीक्षक यांनी प्रत्यक्ष जाऊन तोंडी सूचना दिल्या की सध्या आपण ही जागा रस्ता बाधित आहे बांधकाम करू नये, आपणास जे काही करायचे आहे ते परवानगी घेऊन करावे परंतु जागा मालक व त्या ठिकाणी असणारे भाडेकरू यांनी कुठलीही परवानगी न घेता त्या ठिकाणी दहा बाय दहा या आकाराचे एकूण तीन दुकाने बांधून त्याला दर्शनी भागात शटर लावले होते. त्याच्या बाजूलाच एक पुन्हा खुल्या जागेत कच्चे पक्के बांधकाम चालू होते. सदर बांधकाम व  तीन दुकाने जेसीबीच्या साह्याने निष्कासित करण्यात आली. कारवाई करताना सर्वप्रथम बांधकाम कारवाईला विरोध केला व नुकसान भरपाई द्या आम्हाला आमच्या जागेचा मोबदल्याबाबत चर्चा झाली आहे असे त्यांनी सांगितले .

घाटीच्या प्रवेशद्वारालगत कारवाई
घाटी परिसरातील फुटपाथवर व रस्त्यावर तसेच घाटी परिसराच्या मुख्य प्रवेशद्वारा लगत असलेले अतिक्रमण नुकतेच काढले होते परंतु या ठिकाणी  एका व्यक्तीने  दहा बाय बारा या आकाराची लोखंडी टपरी त्या ठिकाणी टाकली होती. याबाबत प्रशासक तथा नियंत्रण अधिकारी यांच्याकडे तक्रारी प्राप्त होत्या. त्या अनुषंगाने सदर पथक त्या ठिकाणी कारवाईस गेले  असता  प्रथम विरोध करण्यात आला नंतर सदर टपरी  जप्त केली. रस्त्यावरील इतर अतिक्रमणेही काढण्यात आली. 

सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक  जी. श्रीकांत  यांच्या आदेशाने नियंत्रण अधिकारी तथा अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त तथा अतिक्रमण अधिकारी रमेश मोरे झोन क्रमांक दोन आणि संजय सुरडकर, अतिक्रमण निरीक्षक  सय्यद जमशीद, रवींद्र देसाई सागर श्रेष्ठ यांच्या पथकासह  नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव आदींनी कारवाई सहभाग घेतला.